अमरावती : बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर जर दुबार पेरणीची वेळी येत असेल तर त्या विक्रेत्याला जामिनही मिळणार नाही, अशी कठोर कारवाई करावी, तसेच ज्या भागात बोगस बियाणे आढळून येथील तेथील कृषी अधिकाऱ्याला जबाबदार धरुन त्यांच्याविरुध्द देखील गुन्हा दाखल करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी कृषी विभागाच्या बैठकीत दिलेत.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात पालकमंत्र्यांनी कृषी विभागाच्या कामकाजाचा आढावा शुक्रवारी घेतला. या आढावा बैठकीला आ. प्रताप अडसड, आ. राजेश वानखडे, आ.प्रवीण तायडे, आ. उमेश यावलकर, आ. रवी राणा यांच्यासह विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लव्हाळे, एसएओ राहूल सातपुते व तालूका कृषी अधिकारी उपस्थित होते.शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषि अधिकाऱ्यांनी काय प्रयत्न केलेत हा या बैठकीतील कळीचा मुद्दा होता. यावर अमरावती व धारणी तालूका कृषी अधिकाऱ्यानी समर्पक उत्तरे दिलीत. दहा कृषी अधिकारी प्रशिक्षणासाठी गेले असल्याने त्या तालूक्यातील स्थिती स्पष्ट झाली नाही. पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषी अधिकाऱ्यांनी सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत गावागावात शेतकऱ्यांसोबत संवाद बैठका आयोजित करण्याचे निर्देश दिले. येत्या १९ जुलैपर्यंत सदर कार्यक्रम राबविण्यात यावेत व त्याचा अहवाल २९ जुलैला होणाऱ्या बैठकीत मांडावेत असेही निर्देश दिलेत. अमरावती हा देशाचे पहीले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जिल्हा आहे. त्यांनी कृषी क्रांती घडविली होती. त्याचाच कित्ता गिरवत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी नविन कृषी क्रांती घडविण्यासाठी नाविण्यपुर्ण कार्यक्रम राबवावेत. हा प्रयोग अमरावती पॅटर्न म्हणून राज्यात राबविता आला पाहीजे, असा उपदेश पालकमंत्र्यांनी यावेळी केला.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा