अमरावती – शहराच्या स्वच्छतेसाठी निर्णायक पावले उचलत अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी गोपाल नगर, दस्तुर नगर आणि छत्रीतलाव परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसरातील अस्वच्छता, अनधिकृत अतिक्रमण, आणि नियमभंग करणाऱ्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
आयुक्त यांनी स्पष्ट निर्देश दिले की, "या सप्ताहाअखेरपर्यंत सर्व डस्टबिन नसलेल्या ठेल्यांवर कारवाई करावी. अशा सर्व ठेल्यांची उचल करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी." यासोबतच "ज्या फूटपाथवर टिनशेड लावण्यात आले असून त्यांना पूर्वीच नोटीस बजावण्यात आली आहे, त्या सर्व अतिक्रमणांवर कठोर कारवाई करून ती हटवून जप्त करण्यात यावीत," असेही निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी अनधिकृत निळ्या खोके, पान ठेले व फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात कचरा करताना दिसून आले. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अशा फेरीवाल्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले.
त्यांनी सांगितले की, "शहराच्या स्वच्छतेसाठी अतिक्रमण आणि कचरा पसरवणाऱ्या विक्रेत्यांविरोधात शून्य सहनशीलता ठेवण्यात येईल."
या दौऱ्यात आरोग्य विभाग, अतिक्रमण पथक, झोनल अधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी आयुक्तांच्या कृतीशील आणि थेट हस्तक्षेपाचे स्वागत केले.
आयुक्त यांनी नागरिकांना आवाहन केले की, "स्वच्छ अमरावतीसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे."
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा