अमरावती : पतीच्या हत्येनंतर 'हम उन्हे भुला नही सकते!, उनके बिना जिंदा भी नहीं रह सकते, उनके बिना हमे जीने का अधिकार भी नही है, उनके बिना ये जिंदगी अधुरी है, अशा ओळी लिहित एका २३ वर्षीय महिलेने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. स्थानिक मसानगंज येथील रमेश ऑइल मिल गल्लीत २५ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास ती हृदयद्रावक घटना घडली. ज्युली ऊर्फ इशिका आदर्श गुप्ता (२३) असे मृत महिलेचे नाव आहे. ज्युली यांच्या आत्मघाती पावलामुळे त्यांची आदर्शिका ही अवघ्या सहा महिने वयाची मुलगी पोरकी झाली आहे.
स्थानिक कडबी बाजार परिसरात २ मार्च रोजी सायंकाळी आदर्श राजेश गुप्ता (२६, रा. मसानगंज) या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून आदर्शची पत्नी ज्युली ऊर्फ इशिका या विमनस्क राहत होत्या. पतीवर प्रचंड प्रेम असल्याने त्या सतत विचामग्न राहायच्या. पतीशिवाय मी अस्तित्वहीन झाले. आता कुणासाठी जगायचे, हा एकच प्रश्न त्या विचारायच्या. पतीविरहात अबोल झालेल्या ज्युली यांनी अखेर २५ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. मसानगंज येथील राहत्या घराच्या तिसऱ्या माळ्यावरील खोलीत त्यांनी फॅनला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. बऱ्याच वेळची का खाली आली नाही, असा विचार करून तिसऱ्या माळ्यावर पोहोचलेल्या सासूला सुनेचा मृतदेहच गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. ज्युली ऊर्फ इशिका या पतीच्या मृत्यूनंतर सासू सासऱ्यांसमवेत मसानगंज येथेच राहत होत्या
सुसाईड नोट मिळाली
घटनेची माहिती तातडीने नागपुरी गेट पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना तेथे सुसाईड नोटदेखील मिळून आली. पतीच्या मृत्यूनंतर आपल्याला जीवन जगण्याचा कुठलाही अधिकार नाही, असे लिहित मुलगी आदर्शिका हिला इंग्रजी माध्यमातून उच्चशिक्षण द्यावे, तिचे पालनपोषण करावे, अशी विनंती सासू-सासऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद असल्याची माहिती नागपुरी गेट पोलिसांनी दिली. दरम्यान, शवविच्छेदनानंतर गुरुवारी दुपारी ज्युली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा