अमरावती : कर्जबाजारीपणा व आर्थिक संकटांना कंटाळून जिल्ह्यात चार शेतकऱ्यांनी कर्जापायी मृत्यूला कवटाळले असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार, २७ जून रोजी उघडकीस आला. यामध्ये वरूड तालुक्यातील दोन, तर अचलपूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील प्रत्येकी एका घटनेचा समावेश आहे.
वरुड तालुक्यातील देऊतवाडा येथील दोन दिवसांपूर्वी घरून निघून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह शुक्रवारी आढळून आला. रत्नाकर तुकाराम लव्हाळे (४४) असे या मृतक शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. रत्नाकर लव्हाळे यांनी काही वर्षांपूर्वी दोन एकर शेती केवळ दोन लाख रूपयांत विकली होती. शेती खरेदी करणाऱ्याने शेतातील सर्व पिकाचे उत्पन्नही घेतल्याने त्या व्यवहारात रत्नाकर लव्हाळे यांची फसवणूक झाली होती. अशातच सततची नापिकी,कर्जबाजारीपणा यामुळे रत्नाकर लव्हाळे दोन दिवसांपूर्वी घरून निघून गेले. अखेर गुरुवार, २६ जुन रोजी चैनपूर शेतशिवारातील भारत हरिभाऊ फुले नामक शेतकऱ्याच्या शेतातील विहीरीमध्ये रत्नाकरचा मृतदेह आढळून आला. रत्नाकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. तसेच तालुक्यातील वाडेगाव येथील अशोक हरिभाऊ ढोले (५८) या शेतकऱ्यांनेही आत्महत्या केल्याची घटना गुरूवार, २६ जून रोजी मध्यरात्रीनंतर उघडकीस आली. अशोक ढोले यांनी घरीच गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघड झाली. त्यांच्याकडे अवधी दीड एकर शेती असून, त्यावर बँकांचे कर्ज असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. अशोक ढोले यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव अशोक ढोले तालुक्यातील बु. येथील निलेश सुधाकर देशमुख (४५) या शेतकऱ्याने घराशेजारीच असलेल्या नदीपात्रातील उंबराच्या झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. त्यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेत असून स्टेट बँक ऑफ इंडिया व व खासगी सावकारांचे कर्ज असल्याची माहिती आहे. निलेश देशमुख यांच्या पश्चात आई, पत्नी व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
अचलपूर येथील प्रवीण बाबाराव धुळधळ (४६) या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, २७ जून रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रवीण यांच्या पश्चात पत्नी, मुली, मुलगा, आई, वडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा