- अमरावती : रहाटगाव चौक येथील ऑनलाइन लॉटरी सेंटरमध्ये अवैधरित्या ऑनलाइन जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने गुरूवारी तिथे धाड टाकून कारवाई केली. याप्रकरणी चौघांविरूद्ध नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संकेत कुलट रा. राठीनगर अमरावती, रोहन तायडे रा. देशमुख लॉन, गोपी राजू डाखोरे (३०) रा. अप्पर वर्धा कॉलनी अमरावती, तर गणेश झाडे रा. यवतमाळ अशी आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना याबाबत माहीती मिळाली होती. त्यानुसार रहाटगाव चौक येथील 'फोरसिजन मार्केट' मध्ये ऑनलाइन लॉटरी सेंटरमध्ये 'फन टारगेट' या ऑनलाइन वेब साईटवर अवैध असलेल्या चक्री या खेळावर पैसे लावुन जुगार खेळणे सुरू होते; मात्र पोलीस आल्याची चाहुल लागताच जुगारी तेथून पळून गेले. या सेंटरमध्ये ग्राहकांना खेळविणाऱ्या गोपी डाखोरे याच्याकडे शासनाचा कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे त्याच्या ताब्यातून ऑनलाइन जुगाराचे साहीत्य व नगदी असा एकूण २७ हजार ९८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर ऑनलाइन सेंटर संकेत कुलट व रोहन तायड यांच्या मालकीचे आहे; मात्र ते घटनास्थळी आढळून आले नाही. तसेच सदर चक्री गेम चालविण्याकरिता लागणारी आयडी, पासवर्ड व बॅलेन्स गणेश झाडे याच्याकडून ऑनलाइन घेतल्या जात असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात चौघांविरूद्धही गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, पोलीस कर्मचारी गजानन ठेवले, दिपक सुंदरकर, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, योगेश पवार, राजीक रायलीवाले, विशाल वाकपांजर, सागर ठाकरे, चेतन कराडे, संदीप खंडारे, राहुल दुधे यांनी केली.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा